ही माहिती मुख्यत्वे "श्रीक्षेत्र बाळेकुंद्रीचे श्रीपंतमहाराज - संक्षिप्त जीवन परिचय", लेखक श्री. वसंत भिमराव देशपांडे यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. हे पान निर्माणाधीन असून यथावकाश त्यात भर घातली जाईल.

भारतात प्रचलित असलेल्या विविध उपासनामार्गात अवधूत संप्रदायाचे महत्व वेगळेच आहे. श्रीदत्तात्रेयांनी स्थापन केलेल्या या मार्गात परंपरेला फार महत्व आहे. भक्तांना आलेल्या अनुभवांनी हे परंपरेचे महत्व दृढ होते आहे. एकविसाव्या शतकात पुढे जाताना आपल्या संस्कृतीची जाणीव असणे, आपल्या मातीतल्या संतांची शिकवण ज्ञात असणे, आपल्या पुर्वजांच्या इतिहासचे भान असणे, त्यांच्या अनुभवांवरून प्रचलित झालेल्या परंपरांची माहिती असणे फारच जरूरीचे आहे.

एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या संधिकालात अवतरलेल्या सिद्धपुरुष संतमंडळीत श्रीपंतमहाराजांचे स्थान फारच महत्वपूर्ण आहे. आदर्शवत गृहस्थाश्रम चालवूनही केवळ आत्मोद्धाराचा विचार न करता सद्गुरुंच्या आज्ञेनुसार लोकसंग्रहासाठी व लोकोद्धारासाठी अवधूत संप्रदायाचा प्रसार करणार्‍या व आत्मसामर्थ्याने बाळेकुंद्री गावाला महान क्षेत्राचे स्वरूप प्राप्त करून देणार्‍या श्रीपंतमहाराजांचे अवतारकार्य प्रापंचिकांना तसेच परमेश्वर प्राप्तीसाठी मार्गदर्शक उत्सुकांना अत्यंत मौलिक ठरले आहे.

पूर्वज व बालपण

अठराव्या शतकातील राजादेऊळ्गावचे वतनदार कुलकर्णी (देशपांडे) श्रीपंतमहाराजांचे पूर्वज होत. ते ऋग्वेदी भारद्वज गोत्री देशस्थ ब्राम्हण होते व जवळच्या गाणगापूर तिर्थक्षेत्रीच्या श्रीनृसिंहसरस्वतींच्या ठायी त्यांची दृढ भक्ती होती. या घराण्यात नरसिंहपंत जन्माला आले. त्यांनी एका पायावर उभे राहून श्रीगुरुचरित्राचे पारायण केले. तेव्हा श्रीदत्तात्रयांनी प्रसन्न होउन त्यांना दृष्टांत दिला व "तुझ्या सातव्या पिढीत मी अवतार घेईन" असा आशिर्वाद दिला. दत्तकृपेने त्यांना निजामाकडून बाळेकुंद्रीच्या जवळपासच्या सतरा गावांचे कुलकर्णिक़ीचे काम मिळाले व ते बाळेकुंद्रीला येऊन स्थायिक झाले. वरील दृष्टांताप्रमाणे या घराण्यातील सातव्या पिढीत श्रीपंतमहाराजांनी जन्म घेतला.

श्रीपंतांचा जन्म बेळगावजवळील दड्डी या गावी झाला. श्रावण वद्य अष्टमी, कृष्णाष्टमी, सोमवार शके १७७७ म्हणजे दि. ३ सप्टेंबर सन १८५५ रोजी दुपारच्या तिसर्‍या प्रहरी त्यांनी अवतार घेतला. कृष्ण जन्मीच्या दिवशी जन्म घेतल्याने त्यांचे नाव आधी श्रीकृष्ण असे ठेवले. पुढे बाळेकुंद्रीला गेल्यावार त्यांना दत्तात्रय असे बोलावू लागले व "दत्तात्रय रामचन्द्र कुलकर्णी" अशा नावाने ते ओळखण्यात येऊ लागले. दड्डी त्यांचे आजोळ होते व बाळेकुंद्रीला त्या काळी प्राथमिक शाळाही नसल्याने श्रीपंतांचे बालपण दड्डीला व्यतित झाले. आजोळच्या धार्मिक वातावरणाने गुरुभक्तीचे वेड त्यांना लहानपणापासूनच लागले. लहानपणीच्या सवंगड्यांनाही श्रीपंतांनी भक्तीमार्ग दाखवून व बोध देऊन उपकृत केले.

पुढच्या इंग्रजी शिक्षणासाठी १४-१५ व्या वर्षी ते बेळगावला आले. या सुमारास कर्नाटकात लागोपाठ दुष्काळ पडला व श्रीपंतांच्या घरून येणारी आर्थिक मदत कमी पडू लागली. श्रीपंतांना शिक्षणाचे तर अतिशय वेड होते. मिळतील तशा शिकवण्या करून त्यांना अभ्यासक्रम चालवावा लागला. श्रीपंतांना व्यायामाची व कुस्तीचीही आवड होती. त्यांची शरीरयष्टीही त्यामुळे दणकट होती. अशा प्रकारे बेळगावात आयुष्य व्यतित करत असताना त्यांची भेट बालमुकुंद अथवा बालावधूतांशी झाली.

सद्गुरु भेट

श्री बालमुकुंद उर्फ बालावधूत यांचे संपूर्ण नाव बाळाजी अनंत कुलकर्णी असे असून ते ऋग्वेदी देशस्थ ब्राम्हण होते. बेळगावजवळील पार्श्ववाड या गावी ते कुलकर्णिकी करीत होते व सांसारीक होते. सद्गुरु कृपेच्या आशेनी त्यांनी संसाराचा त्याग केला व ते अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या करू लागले. तेथे त्यांना रामचैतन्य(रामावधूत) भेटले. रामचैतन्यांनी बाळाप्पांवर अनुग्रह केला व अवधूत संप्रदायाची दीक्षा दिली.

बाळाप्पा वेगवेगळ्या गावांत राहून कड्डेगुर्दीला आले. एव्हांना ते योग्यांच्या अत्युच्च स्थितीला पोहोचले होते. नित्यानंदवासी असल्याने त्यांचे वेशभूषेकडे लक्ष नसायचे. त्यांच्या जटा व दाढीमिशा खूप वाढलेल्या असून ब्राम्हणांप्रमाणे ते यज्ञोपवीत घालत. ते लिंगायतांप्रमाणे गळ्यात शिवलिंग बांधत, स्मार्तांसारखी सर्वांगाला विभूती लावत व वैष्णवांप्रमाणे गंध व शंखचक्रांकित मुद्रा लावत. अवधूत संप्रदायात सर्व पंथ आहेत पण तो कुठल्याच पंथाचा नाही असे त्यांना जणू सुचवायचे असेल. लोकांनी जरी अशा वागण्यामुळे सुरवातीस त्यांच्याअनादर केला तरी हळूहळू त्यांच्या सामर्थ्याची जाणीव सगळ्यांना होऊ लागली व त्यांचे शिष्यगणांची संख्या वाढू लागली. श्रीपंतांनी 'श्रीबाळबोधामृतसार' या लेखात त्यांचे असे वर्णन केले आहे :-

" सहज-स्थितीत जनोद्धार करीत अंतर्बाह्य बोधरूप बोलणे तो वेदांत, चालणे तो सिद्धांत. ब्रम्हानंदाचा पुतळाच होऊन, कशाचेही चिंतन नसतां बालवत, परतंत्राने देहादिकांचे व्यापार चालत नसून भीती, शंका-लज्जा, आपपरभाव-रहीत होऊन, सदा आत्मा, ब्रम्ह, गुरू एकरूप होऊन दग्धपटवत देह प्रारब्धचक्राने फिरत असताही कुलालचक्रस्थित मक्षिकेप्रमाणे अंतरानुभव, किंचित भानावर न येता सर्व जग आत्माच हा अनुभव, ज्यास-त्यास ज्याचे त्याचे योग्यतेनुसार दिसून, ज्या भावाने जो भजेल त्यास त्याप्रमाणे फलदाता होत. ज्या रंगात मिळवावे त्याप्रमाणे होत असून विविध विषयरंजनास अभिमानाचे तोंड न देता; दिसण्यास मूढ, असण्यास पूर्ण ज्ञाता, बोलण्यास वेडा, बोधास परमहंस, व्यवहारात भोगी, अंतरंगात राजयोगी, पाहण्यास देही, अदृश्यास विदेही, कैवल्य साम्राज्यपदी स्थिरासन झालेला, चारी योगांवर ज्यांचे शांतीस्थान, ज्याचे अंतर कळणेच नाही, फक्त त्याचे अनन्य भक्त जाणून तद्रूप झाले, जो निराकार, निरंजन, निर्विकल्प, निरामय असा होऊन महीवर विचरतो, तो पंचाक्षरी नामधारक सद्गुरु बालमुकुंद होय."

बाळाप्पा आपल्या शिष्यांशी फार प्रेमळपणे वागत. त्यांनी गुरुत्व कधीच मिरवले नाही. ते शिष्यांकडून कधीच पाया पडून घेत नसत. "माझ्याकडे आल्यावर मग रे काय? तू राहिलास नाहीस, मरून गेलास. आता कोणाच्या पाया पडतोस?" असे म्हणत. पंतांनी असे म्हटले आहे-

बालावधूत सद्गुरु जनीं आगळा ॥ धृ ॥
अद्वैत बोधामृत पाजूनी । चुकवितो भवघाता ॥ 1 ॥
पिसेंपण मिरवीत आपण । खेळवी भक्तमेळा ॥ 2 ॥
पूर्ण कृपे निजखूण दावूनी । प्रगटवी दत्तकळा ॥ 3 ॥
पद ३१५

बाळाप्पांना नुसत्या पुस्तकी ज्ञानाचा तिटकारा होता. त्यांचा सर्व भार अनुभवावर होता. "तुझा अनुभव काय तो सांग, मेलेले असे म्हणतात, तसे म्हणतात, अशी मेलेल्यांची उसाबर तुला कां?" असे म्हणत. ते जसे पूर्ण ज्ञानी होते तसेच पूर्ण वैरागीही होते. त्यांचे वैराग्य विवेकसंपन्न वैराग्य होते. जरी त्यांनी मोहजालात गुंतविणारे माया-पाश तोडले होते तरी भक्तांच्या भक्तिप्रेमपाशात ते जणू बद्ध झाले व एक प्रकारचा अवधूताचा संसारच त्यांनी मांडला. ते शुद्ध प्रेमाची मूर्तीच होते. सदा आत्मरंगी रंगून इतर संभाषण फारसे करीत नसत. त्यांनी एकतारी कधी जणू खालीच ठेवली नाही. आज त्यांची सुमारे 60 कानडी पदे उपलब्ध आहेत. बाळबोधामृतसार हा ग्रंथ पंतांनी त्यांच्या "मूक नागबेकु । जनरोळु जणागिरबेकु ॥" या पदावर मुख्यत्वेकरून लिहीला आहे.

कड्डेगुर्दी गावातील बसवण्णांच्या देवळातील एक खोलीत ते रहात. गावाच्या मागे असलेल्या डोंगरातल्या "कर्डीकोळ्ळ" या ठिकाणी ते कधीकधी बसत. तेथून पश्चिमेकडे असलेली "अय्यनफडी" ही गुहा त्यांना एकांतासाठी आवडायची.

बाळाप्पांच्या शिष्यमंडळीत सर्व जातीचे लोक होते. गावातील बहुतेक ब्राम्हणांनी त्यांचा अनुग्रह घेतला होता. पंतांच्या बरेच नातेवाईक बाळाप्पांचे अनुग्रहित होते. पंतांचे मावसबंधू गणू मारीहाळकर हणमू दड्डीकर हे पंतांना फार प्रिय होते. दोघेही बाळाप्पांचे परम भक्त होते मात्र त्यांच्यासमवेत असताना पंत कधीच बाळाप्पांविषयी बोलत नसत. बाळाप्पांच्या अधिकारांबद्दल माहिती नसल्याने पंत बाळाप्पांची निंदाच करत. एकदा पंतांनी बाळाप्पांविरुद्ध एक पत्र गणूला लिहीले. कर्मधर्मसंयोगाने ते पत्र बाळाप्पांनी पाहिले. "हे पत्र लिहीणारा मरतो बघ" असे बाळाप्पा रागाने म्हणाले. गणू एकदम घाबरला व बाळाप्पांच्या पाया पडून रडू लागला. तेव्हा हसत हसत बाळाप्पा म्हणाले "अरे तुझा दत्तू तो माझाच रे, तो मरतो म्हणजे माझ्याकडेच येतो बघ." असे ऐकताच गणूला खूप आनंद झाला व त्याने पंतांना कड्डेगुर्दीस येण्याबद्दल पत्र लिहीले.

त्याच सुमारास श्रीपंतांची तब्येत एकाएकी पोटदुखी व तापामुळे बिघडली. अशातच हे पत्र त्यांना मिळाले. त्यामुळे आपण येऊ शकत नसल्याचे त्यांनी गणूला कळविले. अर्थातच गणूने बाळाप्पांना तसे सांगीतले. बाळाप्पांनी पंतांसाठी विभूती व प्रसाद दिला व भजन आणि नामस्मरण करण्यास सांगितले. हा प्रसाद व निरोप घेऊन आलेला गणू पंतांसाठी जणू देवदूतच होता. त्याप्रमाणे केल्यावर पंत बरे झाले व कड्डेगुर्दीला येऊन पोहोचले. तिथे गेल्यावर मात्र बाळाप्पांच्या समोर जाण्याची त्यांची हिम्मत होईना. कारण, ज्या सत्पुरुषाची पूर्वी निंदा केली होती त्यानेच विभूतीप्रसाद पाठवून आजारातून बरे केले होते. ते येत नाहीतसे बघून बाळाप्पाच त्यांना भेटण्यास आले. पंत मग घाबरून घराच्या गोठ्यात गवतामागे लपून बसले. बाळाप्पा शोधत तिथे आले व म्हणाले "माझ्या अनादिपुत्रा, आता किती दिवस लपून बसणार? मी तुझी कित्येक दिवस वाट पहात आहे. बाळा तु माझा अनादिपुत्र, माझा कुलोद्धारक आहेस. तेव्हा माझ्याकडे येण्यास संकोच कसला? भीती का?". बाळाप्पांची ही प्रेमळ वागणूक पाहून पंत सर्व संशय, तर्ककुतर्क, पुर्वग्रह विसरले व अंतःकरणपुर्वक बाळाप्पांना शरण गेले. प्रथम भेटीतच पंत बाळाप्पांच्या प्रेमाकर्षणात सापडले ते कायमचेच.

गुरुद्वादशी, शके १७९७( सन १८७५) या मंगलदिनी बाळाप्पांनी पंतांना कड्डेगुर्दीस अनुग्रह दिला. गुह्य तत्वबोध करून अनादिसिद्ध, श्रुतिसंमत अशा अवधूत संप्रदयाची दिक्षा दिली. यथावकाश कड्डेगुर्दी व देसनूरला खडतर योगाभ्यास त्यांच्याकडून करवून घेतला व परिपूर्ण केले. या अनुभवाबद्दल पंतांनी म्हटले आहे, "आपल्या हृदयातिल बोधरवीचा उदय होऊन, अज्ञानरूपी रात्र समूळ नाहिशी होऊन बोधप्राप्ती होताच सहज स्थिती लाभून अद्भूत व दिव्य अनुभव आला".

सद्गुरु दर्शनाचे शिष्याच्या जीवनातले महत्व सांगताना पंत म्हणतात :-

इतर पाहिजे ती वस्तू केव्हां न केव्हां तरी हाती लागेल पण सद्गुरु मिळणे फार कठीण. अपार पुर्वसुकृत असल्याशिवाय गुरुची गाठ पडणे नाही. तराजूच्या एका पारड्यात सद्गुरु दर्शनाचे पुण्य घालून दुसर्‍या पारड्यात ब्रम्हांडाची ब्रम्हांडे घातली तरी दर्शनलाभाचे पारडे अचल राहिल व किंचीतही जागा सोडणार नाही. सद्गुरु-दर्शनदिवस हा अनंत युगातील, अनंत जन्मांतील एक सुदिन, पर्वकाळ व दिव्य योग-घटिका आहे. सद्गुरु दर्शनच बुद्धि-सुर्याचे उत्तरायण, स्वर्गद्वाराचे, मुक्तीद्वाराचे उद्घाटन व भाग्योदय. सर्व तीर्थाटणे, सर्व व्रते, सर्व साधने, सर्व उपासना, सर्व जपतप-अध्ययन, सत्कर्मे, सर्व परोपकार ही एकाच वेळी, एकाच क्षणी सद्गुरुयोगरूपे फळतात.

गुरुपरंपरा

श्रीपंतांनी आपल्या गुरुपरंपरेचे वर्णन 'आत्मज्योति' लेखात पुढिलप्रमाणे केले आहे :

दुजाभाव दवडून अतिगुप्तपणे श्रीदत्तात्रेयस्वामींनी रामचंद्र अवधूत यांस ज्या गुह्यगोष्टी सांगितल्या त्याच रामावधूताने एकांती बसून, दुजेद्रुष्टीस न पडेल अशा गुह्य मार्गाने श्रीबालावधूतांस उपदेशिल्या, श्रीसद्गुरु बालमुकुंदांनी जंबुनगरी निर्जन गुहेत दीनदत्तास निजबोध सांगितला. याच मार्गाने काही एकांना यथार्थस्थिती प्राप्त झाली. एवं परंपरेने उपदेशस्थिती गुप्तमार्गाने चालत आली.

आपली गुरुपरंपरा श्रींनृसिंहसरस्वतींपासून चालत आलेली आहे असेही श्रीपंत सांगत व त्यांच्या काही पदांतून तसा स्पष्ट उल्लेखही आहे. श्रीपंतांची पात्रता पाहून बाळाप्पांनी इ. स. १८७७ मध्ये श्रीपंतांना गृहस्थाश्रमीच राहून आपला संप्रदाय चालवावा अशी आज्ञा दिली व "हा फार अधिकारी आहे व तोच माझा मार्ग पुढे चालवील, तरी सर्वांनी त्याचे आज्ञेत रहावे" असा उपदेश इतर शिष्यांना केला. यानंतर लगेच ते श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या यात्रेस गेले व परत आलेच नाहीत.

सांसारिक जीवन

पंत मॅट्रिकची परीक्षा १८८० मध्ये पास झाले व लगेच 'लंडन मिशन हायस्कूल' मध्ये नोकरी धरली. क्रमाक्रमाने त्यांनी आपल्या धाकट्या भावांना शिक्षणासाठी बेळगावला आणले. १८८२ मध्ये वैशाख वद्य प्रतिपदेला त्यांचा विवाह रायबाग इथे झाला. त्यांच्या सौ. यमुनाक्का म्हणजे पंतांचे मातुल (मामा) श्री. श्रीपादपंत यांच्या कन्या होत. विवाहापासून पंत घराण्याच्या उत्कर्षाला प्रारंभ झाला. यमुनाक्कांच्या रुपाने जणू अन्नपूर्णा गृहलक्ष्मीच त्यांच्या गृही आली. त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली पण ती फार काळ जगली नाहीत.

श्रीपंतांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ति-निवृत्तीचा सुरेख संगम होता. त्यांचे घर नेहमी भरलेले असायचे.family पाच बंधू, सहा भगिनी, पंतांचे विद्यार्थी, पाहुणे-रावळे, इतर अतिथी असा गोतावळा असायचा. पंत जरी संसाराच्या जबाबदारीने जास्त शिकू शकले नाहीत तरी आपल्या भावांना मात्र त्यांनी खूप शिकवले. त्यांचे तिघे बंधू, वामनराव, नरसिंहराव व शंकरराव हे बी.ए., एल.एल.बी झाले. त्यापैकी वामनराव सिव्हील जज्ज होते. चौथे बंधू गोपाळराव तर रेव्हेन्यू खात्यात डि. डे. कलेक्टर झाले. त्यांना सरकारतर्फे 'रावबहाद्दूर' हा किताबही मिळाला. पाचवे बंधू गोविंदरावांना मात्र परमार्थाची व भजनाची आवड होती. त्यांनी पंतांचा अवधूतमार्ग पूढे चालविला. श्री दत्त संस्थानाची स्थापना, श्रीक्षेत्रातील दैनंदिन व्यवस्था व पालखी सेवा, श्रीपंतपुण्यतिथी व जयंती उत्सव, संप्रदायाचा प्रसार इत्यादि कार्याला त्यांनी वाहून घेतले. प्रेमळ वृत्ती व निगर्वी स्वभावामूळे ते सर्वजनात "दादा" असे प्रिय होते.

श्रीपंत एक कुटुंबवत्सल ग्रुहस्थ होते. भक्तिमार्गात राहून आदर्श संसार कसा करावा हे त्यांनी दाखवीले. शिक्षणाकरता येणारे विद्यार्थी त्यांच्याकडे तर रहातच पण ज्यांना कोठे आश्रय नव्हता अशी मंडळीही त्यांच्याकडे रहात. उत्तम शील, सौजन्य, सामाजिक बंधने व नीतिमर्यादांचे पालन कटाक्षाने करणे, सत्यप्रियता, जुने वळण, साधी रहाणी, व्यायामाची आवड व त्यानुसार उत्तम शरीरसंपत्ती, गोरगरीबांचा कळवळा व त्यांच्यासाठी अन्नदान, पाहुण्यांचे आदरातिथ्य, गुणग्राहकता, विद्वत्तेबद्दल आदर, वाचनाची आवड, अप्रतिम वक्तृत्वशैली, उत्कृष्ट शिक्षक अशी त्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील.

श्रीपंतांचे वाचन खूप सखोल होते. इस्लामी, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध तसेच लिंगायत संप्रदायाचे पूज्य ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांची बुद्धी तीक्ष्ण होतीच पण स्मरणशक्तीही दांडगी होती. मराठी व कानडीव्यतीरिक्त त्यांना इंग्रजी, संस्कृत व हिंदी भाषाही अवगत होत्या. उपनिषदे, अवधूत गीता, श्रीमत भागवत गीता, श्रीमच्छंकराचार्यांची भाष्ये, उपदेशसहस्त्री, श्री गुरुचरित्र, अम्रुतानुभव, ज्ञानेश्वरी व वामनपंडितांची यथार्थदीपिका असे ग्रंथ त्यांच्या नित्य वाचनातले व अभ्यासातले होते. अमृतानुभव व श्रीमदभगवतगीता तर जणू त्यांना पाठच होती.

"सुविचारी व्यवहाराचा पाया न्याय, नीति, सत्य व सद्गुण यांचेवरच असल्याने सामाजिक सुख मिळते. सद्गुण बंधन जर नसेल तर उच्छृंखल, बेमर्याद, शिमगा, अंदाधुंदी होऊन समाज बिघडेल व अनर्थ होतील. म्हणून सामाजिक बंधने व नीतिमर्यादा ही अवश्य पाळली पाहीजेत."

श्रीपंत वर म्हटल्याप्रमाणे सत्यप्रिय होते. "सत्यमेव जयते", "नहि सत्यात्परो धर्मः" ही त्यांची ब्रीदवाक्येच होती व ठळक अक्षरांत त्यांच्या बसण्याच्या जागेसमोर त्यांनी लावली होती. त्यांना चहाडी, दुटप्पीपणा, खुनशीपणा, बढाईखोरपणा, खोटारडेपणा अशा दुर्गुणांबद्दल अतिशय तिटकारा होता. असे करणारा आढळल्यास त्याला कडक शिक्षा होई. एरव्हीच्या व्यवहारात पंत लक्ष घालत नसत पण महत्वाच्या सर्व गोष्टी ते जाणून असत.

ज्ञानी हा शहाणा असलाच पाहिजे, कारण परमार्थात जे ज्ञान तेच व्यवहारात शहाणपण.

श्रीपंतांची अध्यात्मिक धारणा असूनही आपला प्रपंच त्यांनी दक्षतेने व व्यवस्थितपणे चालवला होता. पंतांच्या कुटुंबाची त्यांच्या कारकीर्दीत चांगलीच भरभराट झाली. प्रपंचाकडे पाहताना पंतांचे सर्व व्यवहार सहजस्थितीत होत. या सहजावस्थेत संसार व परमार्थ एकमेकांच्या आड येत नसत. गुरुदत्तच संसार व परमार्थ चालवीत आहेत अशी त्यांची धारणा होती. "संसार परमार्थ दोन्ही । गुरुदत्त चालवी पहा ॥", "प्रपंच हा परमार्थ जाहला । व्यवहार हा शांतीने भरला ॥", "दत्तवधूता सहज समाधि । हाचि व्यवहारु ॥", "सहजस्थितीने सत्यत्व आणिले । जक्षन क्रीडन श्रुतिबोला ॥" अशा पदांतून पंतांचा संसाराविषयी द्रुष्टिकोन दिसून येतो.

भजनलालसा व साहित्य

श्रीपंत आपली शिक्षकाची नोकरी सांभाळून इतर वेळ आध्यात्मिक ग्रंथ वाचण्यात व त्यावर मनन करण्यात, इतरांशी त्यावर चर्चा करण्यात घालवीत. त्यांना भजनाची फार गोडी होती व दररोज एकतारीवर ते भजने म्हणत. सद्गुरु श्रीबालमुकुंदांच्या सामर्थ्याने व प्रेमाने श्रीपंत इतके मोहून गेले होते की सद्गुरुवाचून अधिक आवडीची कोणतीच गोष्ट त्यांच्या आयुष्यात राहिली नव्हती. जरी श्रीबालमुकुंदांचा सहवास त्यांना दोन-अडीच वर्षेच लाभला तरी मुळच्या भावनाप्रधान पंतांना जन्मभर त्या वेडात गुंतवण्यात तो सहवास पुरेसा होता. अशा उत्कट भावना मनात असता भजन करताना त्या प्रेमलहरी पद्यरुपाने त्यांच्या मुखातून बाहेर येत. अशी पदे, अभंग मग कोणीतरी टिपून ठेवीत. जवळपास ३००० भक्तीगीते आज उपलब्ध आहेत. मराठी व कानडीतल्या या पदांतून पंतांची गुरुभक्ती व गुरुप्रेम दिसून येते. या पदांत प्रेमरस तर आहेच पण नादमाधुर्य, मार्मिक शब्दयोजना व संगीतही आहे. अलंकारांनी जडलेली ही पदे मन मोहून तर टाकतातच पण विचार करण्यासही लावतात. आजही गावागावातून, उत्सवांतून ही पदे म्हटली जातात. पंतांचे भक्तजन ही पदे म्हणताना अगदी रंगून जातात, नाचतातही अशी या पदांची गोडी अजूनही टिकून आहे. भजन गाणे व पुस्तकातली पदे वाचणे ह्यातला फरक खर्‍या भक्तालाच कळतो. गुरुबंधूंसमवेत प्रेमरसात तल्लीन होण्याचे भाग्य खूप कमी लोकांना मिळते. सद्गुरुचा डंका वाजवण्यातले समाधान बहुधा इतर कशातही नसेल.

मिळता बालावधूत पाउले । नरदेहाचे सार्थक जाहले ।।
अभय वचने मुक्त होउनी । बोधामृत प्राशन केले ।।
अवधूतपंथ प्रगट करूनी । सद्गुरुनाम जगी गाजविले ।।
प्रेमामृत पिउनी पाजुनी । दत्तस्वरुपी भक्त जागवीले ।।
पद २५६८

जरी पंतांना स्फुरलेली पदे पंतांनी स्वहस्ते लिहीली नसली तरी शिष्यांना उद्देशून पंतांनी अनेक लेख लिहीले आहेत. 'भक्तालाप', 'बालबोधामृतसार', 'प्रेम-तरंग', 'आत्मज्योती', 'परमानुभवप्रकाश', 'अनुभववल्ली', 'ब्रम्होपदेश', 'प्रेमभेट' हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. इतरही अनेक लेख उपलब्ध आहेत. या सर्व लेखांतून पंतांनी शिष्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या अधिकारानुसार मार्गदर्शन केले आहे. योगशास्त्र, अध्यात्म, धारणा, श्रीसद्गुरुस्तोत्र, नाममहात्म्य, आत्मबोध, साधकाचे कर्तव्य, साक्षात्कार, चमत्कार, अवधूत संप्रदाय, श्रीमद-भगवतगीतासार अशा अनेक विषयांवर पंतांनी बोध केला आहे. श्रीपंतांनी आपल्या भक्तांना जो बोध दिला त्यापैकी काही विचार आज पुस्तकरुपाने प्रकाशित झाले आहेत. श्रीपंतांनी लिहीलेली बोधपर पत्रेही प्रकाशित झाली आहेत.

ह्या वेबपेजवर श्रीपंतांच्या साहित्याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

सद्गुरुभक्ति व नाममहात्म्य

पंतांच्या सद्गुरुबद्दल काय भावना होत्या ते त्यांच्या अनेक पदांतून दिसून येते. जरी ज्ञानाच्या योगानेच कैवल्यप्राप्ती होते असे जरी त्यांनी म्हटले असले, "ज्ञानादेव कैवल्यमार्ग सरळ" (पद 96), तरी त्याच पदात पुढे असे म्हटले आहे की "जो सद्गुरु भजनी रमतो। तो जिताची मुक्त सत्य होतो॥". ज्ञानाचे महत्व तर आहेच पण भक्तीलाही तितकेच, किंबहुना थोडेसे जास्तच महत्व आहे असे ते म्हणत, "भक्तीवीणे शुष्क ज्ञान" (पद २०२). निस्सिम गुरुभक्तीमुळेच पंतांच्या तोंडून असे शब्द येतात, "गुरुही संपत्ती, गुरुही विपत्ती, गुरुविणे गती नही मज" (पद ४१७).

श्रीपंतांच्या ठिकाणी आत्मप्रतीती, गुरुप्रतीती आणि शास्त्रप्रतीती यांचा मिलाप झाला असल्याने त्यांच्या वाणीमध्ये विलक्षण अधिकार प्राप्त झाला होता. सर्व चराचरात व्यापलेले तेज, ज्यावर सर्व जगाचा व्यवहार चालतो, तेच तेज स्वतःच्या आत, आत्म्यात, आहे. आतही तेच व बाहेरही तेच, मग कोणाची पूजा करायची?

अंतरी बाहेरी मीचि विलसे । कोणा पुजू, कोणा ध्याऊ ।।
मीच आधार चिद्विलासा । भेद कैसा भावू ।।
जिकडे तिकडे आत्माराम । नाम कोणाचे गाऊ ।।
दत्तस्वरूपी भान उडाले । उन्मनीमाजी राहू ॥
पद ४६०.

हे ज्ञान ज्या गुरुने दिले, ज्याने आपल्याला निर्भय बनविले, त्या गुरुची प्रचीती तर अनुग्रहाच्या वेळी आली होतीच पण नंतरही आयुष्यभर तो दिसतच असतो. जरी लौकिक अर्थाने तो जरी या जगात नसला तरी तो जाणवतच असतो. त्याचे सामर्थ्य, त्याचा आपल्या पाठीवर ठेवलेला वरदहस्त ह्या गोष्टी खर्‍या भक्तालाच जाणवतात. सद्गुरुने जे दाखवले आहे, जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे, त्यावर चालत असता सदुरु आपल्यापासून कधीही दूर नसतो. शास्त्रांत आणि वेदांत तरी काय वेगळे आहे?

भक्तीमुक्तिदाता सद्गुरु आमुचा कैवारी । कळीकाळासी धाक जयाचा, अनुपम थोरी ॥
लज्जा भीती शंका नाही मानाची आस । सहजानंदे भजनी रमतो होउनी उदास ॥
स्वानुभव गुरु श्रुति प्रमाण आमुच्या सिद्धांता । आणीकांची भीड न धरू न मिळू अन्य मता ॥
नेति नेति वेद बोलती तोचि आमुचा स्वामी । अभेद भक्ति आंगी जिरवुनी डुलतो दत्तप्रेमी॥
पद २१६

शिष्यप्रबोधन

सन १८८० पासून पंतांनी शिष्यप्रबोधनास सुरुवात केली व अखेरपर्यंत ते कार्य चालूच ठेवले. ब्रम्हविद्या तर शिकवलीच पण अभ्युदयाचाही मार्ग दाखविला. एकाच वेळी अभ्युदय आणि निःश्रेयस यांचा मार्ग दाखवणारा श्रीपंतांसारखा कुशल वाटाड्या क्वचितच भेटतो.

ब्रम्हविद्येबद्दल काही विचार इथे मांडणे सयुक्तिक ठरेल:

श्रीमद्भगवद्गीता का परिचय स्वयं भगवद्गीता के प्रत्येक अध्याय के अंत में कहा गया हैं।
“ ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे............. नाम..............अध्याय: || "
ओंकार परमेश्वर का तत्-सत् रुप में स्मरण करते हुए बताया गया हैं कि यह भगवद्गान उपनिषद् हैं, यह ब्रम्हविद्या हैं, यह योगशास्त्र हैं, जो कृष्ण और अर्जुन संवाद बनकर प्रकट हुआ हैं। भगवद्गीता के इस परिचय में गहनता और व्यापकता दोनों हैं। यह भगवद्गीता उपनिषदों की परम्परा में श्रेष्ठतम उपनिषद् हैं।
इस उपनिषद् के आचार्य श्रीकृष्ण हैं और शिष्य धनुषपाणि अर्जुन हैं। आचार्य श्रीकृष्ण समस्त ज्ञान का आदि और अन्त हैं। वे स्वयं अनन्त हैं। शिष्य अर्जुन जिज्ञासु हैं, गुरुनिष्ठ हैं और अपने सदगुरु भगवान गुरु को पूर्णत: समर्पित है। सदगुरु व सत्शिष्य की इसी स्थिति में ब्रम्हविद्या प्रकट होती हैं। सृष्टि व जीवन के सभी रहस्य कहे-सुने-समझे व आत्मसात किये जाते हैं, परन्तु इन रहस्यों का साक्षात् व साकार तभी स्पष्ट होता हैं, जब शिष्य योगसाधक बन कर सदगुरु द्वारा उपदिष्ट योग-साधना का अभ्यास करे। योग की विविध तकनीको का इसमें प्राकट्य होने से ही गीता योगशास्त्र हैं। उपनिषद्प्रणीत यह ब्रम्हविद्या-योगशास्त्र तभी समझा जा सकता हैं, जब कृष्ण-अर्जुन संवाद की स्थिति बनें।
Posted by राजेंद्र माहेश्वरी, http://awgpchintan.blogspot.com/

पंत असे कधीच म्हणाले नाहीत की "देहादि जग नश्वर आहे, संसार पापमूलक व खोटा आहे म्हणून त्याचा त्याग करावा." श्रीपंत म्हणत,

प्रत्येकाने आपापली परिस्थिती ओळखून, आपल्यावरील विविध जबाबदार्‍यांची, आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून, अत्यंत दक्षतेने वागून अभ्युदय व निःश्रेयसाची प्राप्ती करून घ्यावी.
बाळाप्पा श्रीशैल्यावर निघून गेल्यावर त्यांना उद्देशून पंतांनी म्हटले आहे
ही नवखंड पृथ्वी (देहाभिमान) सोडून तू श्रीशैल्यशिखरी वस्ती केल्याने सबंध नवखंड पृथ्वी ओसाड पडली; तर ती ओसाड पडून काय कामाची? पृथ्वीवर खेळ की, जन उद्धरतील, शिखरावर तुझा तू एकटाच बसलास. त्यायोगे जगावर काय उपकार केलेस?
संसार हा चिच्छक्तीचा विलास आहे असे सांगताना पंत म्हणतात
संसाराचे हे अनादि चक्र कोणी सैतानाने अथवा वेताळाने केलेले नसून तो चिच्छाक्तीचा विलास आहे. या चिद्विलास नाटकात प्रत्येकाने आपली भूमिका योग्य तर्‍हेने बजावली पाहिजे. प्रत्येक प्राणी हा या विश्वरंगभूमीवरील सोंग आहे. या विश्वनाटकात प्रत्येकाला निरनिराळी कामे निरनिराळ्या वेळेवर नेमली आहेत. ते कर्तव्य नीट रीतीने बजावून, प्रेक्षकांना व आपल्याला संतोष उत्पन्न करीतच या सोंगाचे विसर्जन करावे, हा विहीत मार्ग. तो सोडून व प्रेमाचे विस्मरण पडून, मूळ स्थिती, स्वरूप व सहज उद्देश्य ही लक्षात न राहून; प्रेमाचेच बिघडलेले स्वरूप- जो मोह, त्याच्या तडाख्यात सापडून प्राणी तडफडतो आणि खेळाचा बेरंग करून, आपल्याला व आपणास पहाणार्‍यांना दुःख देवून, दुःखानेच निघून जातो. अनुच्छिष्ट सद्गुरुच्या प्रेमळ स्फुर्ति उदरात (त्याच्याच प्रेमानंदभरात) उदय पावून, त्याचे शुद्ध-प्रेम-विश्व-अंकावरच प्रेमानंद स्तनपान करत, पुन्हा त्या अद्वितीय प्रेमसागरी लीन होउन जाणे हा या सोंगाचा अनाद्यनंत व्यवहार चालला आहे. हा सहजानंद चिद्विलास आहे.
संसारतापाने विकल झालेल्या आपल्या एका शिष्यास पंत असे लिहीतात
जोपर्यंत मनुष्याला "आपले काही कर्तव्य आहे" अशी समजूत आहे, तोपर्यंत त्याने यत्न अवश्यच केला पाहिजे, एरव्ही ठराविक गोष्टी साहजिक घडून येतातच. आपल्या इच्छेनुसार जर संसार चालला तर मग परमार्थाची किंमत कोणी मानिली नसती. संसार हा केव्हा विषम, केव्हा सम असा दिसत असणारच. त्यात आपण मात्र समत्व सोडता कामा नये. ओघप्राप्त कर्तव्य मोठ्या धैर्याने व चातुर्याने बजावीत, सहज स्थितीने प्रपंचात राहूनच, परमार्थप्राप्ती झाली पाहिजे.

पंतांचा शिष्यवर्ग फार मोठा होता व भिन्न जातींच्या व धर्माच्या लोकांचा त्यात समावेश होता. ते सर्व एकमेकांशी बंधुप्रेमाने वागत असत. सुटीत श्रीपंत अक्कोळ, बेडकिहाळ, कोल्हापूर, हुबळी, दड्डी, हुक्केरी वगैरे भागांत आपल्या भक्तांना भेटण्याकरता जात. तेथे भजन, टिपरी, बोध असा त्यांचा कार्यक्रम असे. पंत हुबळीस श्रीसिद्धारुढ स्वामींच्याकडे आपल्या भक्तवर्गासमवेत दोनदा जाऊन राहिले होते. श्रीसिद्धारुढ स्वामींशी अध्यात्म, योगविद्या आदि विषयांवर चर्चाही चालत असे. कित्येकदा बेळगावजवळील कणबर्गी, अलतगे किंवा दड्डीजवळील जंगलात ते भक्तमंडळींना घेऊन जात व तेथे त्यांना ध्यानधारणा, समाधी यांचे शिक्षण देत. अशा विजन स्थळी योगारूढ स्थितीत ते एकनिष्ठ भक्तांना अद्भुत प्रेमलीला दाखवीत.

श्रीपंत एक थोर अधिकारी व्यक्ती असल्याने त्यांच्या अनेक भक्तांना वेगवेगळे साक्षात्कार होत. तथापि श्रीपंत स्वतः अशा चमत्कारांना अजिबात महत्व देत नसत. ते म्हणत, "चमत्कार कधीही होत नसतात, भक्तांना त्यांच्या आत्यंतिक श्रद्धेमुळेच ते भासतात."

सिद्धींना व त्याच्या साह्याने घडणार्‍या अद्भुत गोष्टींना जे महत्व आलेले आहे त्याच्या मुळाशी ऐहिक सुखाची लालसाच असते. शुद्ध प्रेम हाच एक मोठा चमत्कार आहे. जे महात्मे मायेचे आशापाश तोडून सर्व सिद्धींच्या मुळाशी वसतात त्यांच्या सान्निघ्यात अशा सिद्धी कधीकधी प्रकट होत असतात. ते कधीच बुद्धीपुरस्पर चमत्कार करीत नाहीत.

सद्गुरुचा लाभ होणे व आपल्या अनेक पापांसहीत त्याने आपला स्वीकार करणे हाही मोठा चमत्कारच म्हटला पाहिजे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे तर सोडाच पण श्रीपंतांच्या तोंडूनही त्यांच्या गुरुंची अजाणतेपणे निंदा झाली होती. तरीही बालमुकुंद त्यांना शोधत आले व त्यांनी श्रीपंतांना आपलेसे केले. आयुष्यात गुरु भेटणे व त्याच्याकडून संपूर्ण व निर्व्याज्य प्रेम मिळणे याशिवाय अद्भुत ते काय?

या जगात आपल्याला न उमजणार्‍या घटना घडत असतातच. सारासार बुद्धीच्या आकलनापलीकडे ही अशी काही कोडी असतात. बालपणापासून मिळवलेल्या ज्ञानाच्या चौकटीत काही वस्तू बसत नाहीत. जगात परमेश्वर आहे का? असल्यास तो कोणी पाहिलाय? नसल्यास हे सर्व जग कसे तयार झाले? दगडमातीतून निर्माण झालेल्या या शरीरात जीव कोणी ओतला? प्रश्न तर अनंत असणारच. जेवढे ज्ञानाचे वर्तुळ वाढेल तेवढाच वर्तुळाबाहेरचे अज्ञान वाढणारच! ह्या ज्ञानाज्ञानाच्या मायाजालातून सुटका करणारा म्हणजेच सद्गुरु. सद्गुरुला शरण गेल्यावर, त्याच्याकडून अनुग्रह घेतल्याने, त्याच्याशी चर्चा करूनच या अशा प्रश्नांची उकल होऊ शकते. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक सद्गुरुवाचून कोण समजावणार.

श्रीपंतांनी त्यांच्या लेखात त्यांना आलेल्या एका अद्भुत अनुभवाचा उल्लेख केला आहे. पंतांचा एक गुरुबंधू गोपाळ श्रीपाद भागोजीकोप यास साधनेस बसलेवेळी श्रीदत्तात्रेयांनी ब्राम्हणरुपात दर्शन दिले व सांगीतले की श्रीपंतांच्या ठिकाणीच माझा अंश आहे. त्या ब्राम्हणरुपी दत्तात्रेयांनी भागोजिकोपांना श्रीपंतांना भेटण्यास व "ॐ श्री" चा अर्थ उकलण्याची आज्ञा केली आहे असे कळविण्यास सांगितले. हे ऐकून मग श्रीपंतांनी त्रैमूर्तीचा फोटो ठेवून भजन करण्यास सुरुवात केली व "ॐ श्री" चा अर्थ उकलण्यास प्रारंभ केला. यासंबंधीतले लेख 'प्रेमनरंग' व 'आत्मज्योती' या ग्रंथांत संकलित केले आहेत.

विश्वरूप दर्शन हे "ॐ श्री" ह्या दुर्बिणीच्या साह्याने घडते असे श्रीपंत म्हणत. ही "ॐ श्री" ची दुर्बिण म्हणजे दिव्यचक्षु अथवा ज्ञाननेत्रच होय. श्रीमदभगवतगीतेच्या अकराव्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णाने अर्जुनाला अद्भुतरम्य व रोमांचकारी विश्वरूप दर्शन घडविल्याचे सुंदर वर्णन आहे. हे विश्वरूप पहायला अर्जुनाला दिव्यचक्षु दिले गेले. असे हे रूप पाहून अर्जुन अतिशय भयभीत झाला व त्याचा कंठ दाटून आला. त्याने हात जोडून भगवंताची स्तुती केली व चतुर्भुज स्वरूपात परत येण्याची विनंती केली. श्रीबालमुकुंदांकडून ज्ञान प्राप्त होताना आपली अशीच स्थिती झाल्याची श्रीपंतांनी सांगितली आहे.

आत्मानुभव घेऊ इच्छिणार्‍या साधकाला 'सर्व कर्ताकरविता परमेश्वरच आहे' हे कधीनाकधी उमजतेच. या जगात सर्व घटना त्या परमेश्वराच्या ईच्छेनेच घडतात. आपल्या हातात काहीच नसते, आपण फक्त विस्मित होऊन बघत राहू शकतो. श्रीपंतांसारखा अधिकारी व्यक्तिही जर असे बोलत असेल तर आपण कोण?

विश्वनाटक सूत्रधार तु । खूण बाणली मजला । अनन्यभावे भजतो तुजला ।।
जडचैतन्य बाहुलीचा । खेळ हा उभवीला । दाविसी निजप्रेमलीला ।।
नटनाटक नाचविता तू । प्रेक्षक तूचि भला । सगळा प्रेमा विलासला ।।
अंतर्बाह्य तूचि अससी । अवधूत प्रेमळा । निरंतर दत्त पदी रमला ।।
पद २४६६

आजोबांना संन्यास-दीक्षा

श्रीपंतांनी त्यांच्या आजोबांना संन्यास दीक्षा दिली तोही एक चमत्कारच म्हणावा लागेल.

सन १८८६ मध्ये श्रीपंतांचे वडील रामचंद्रपंत यांचे आकस्मिक निधन झाले. बाळेकुंद्रीचा सर्व कारभाराचा बोजा मग श्रीपंतांवरच पडला. आजोबा बाळकृष्णपंत व चुलते देवाप्पा आणि जिवाप्पा यांच्या मदतीने तेथील सर्व कारभार सुरळीत चालू लागला. पुढे अधिकच थकल्याने आजोबा श्रीपंतांकडे बेळगावला येऊन राहिले. सन १८९० मध्ये बाळकृष्णपंतांची प्रकृती एकदम खालावली. त्यांचे वयही तेव्हा ८२-८३ झाले होते. आता काही आपण या दुखण्यातून वाचत नाही असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या पश्चात त्यांचे नाव रहाण्याजोगे काहीतरी स्मारक असावे असे काशीकरबुवा यांनी सुचवीले. यासंबंधी सर्व निकटच्या मंडळींशी चर्चा करून आजोबांना चतुर्थाश्रमाची संन्यासदीक्षा द्यावी असे श्रीपंतांनी ठरविले. आजी रुक्मिणीबाई यांनीही त्यास संमती दिली. २७ नोवेम्बर, १८९० रोजी आजोबांची प्रकृती खूपच बिघडली. संन्यासदीक्षा देण्यासाठी बेळगावचे प्रसिद्ध वेदमूर्ती नरसिंह भटजी ग्रामोपध्ये यांना पाचारण करण्यात आले. तेव्हा शास्त्राधार पाहून नरसिंहभटजींनी आजोबांना 'विद्वत' संन्यास द्यावा व परमहंस दीक्षा द्यावी असे सुचविले. अशी दीक्षा सहसा एक संन्यासीच देऊ शकतो पण प्रसंगी वैदिकही अशी दीक्षा देऊ शकतात. तेव्हा दुसर्‍या दिवशी कुलपुरोहित व इतर विद्वान ब्राम्हणांतर्फे होमहवन झाले व आजोबांना सक्षौर प्रायश्चितही दिले गेले. यानंतरचा विधी आजोबांना अनुग्रह देण्याचा होता. असा मंत्र देण्यास कोणीही तयार होईना. कागदावर हा मंत्र लिहून आजोबांना वाचावयास दिला तर त्यांना अधू दृष्टीमुळे तो वाचता येईना. सर्व कार्यक्रमच अडून राहिला. शेवटी काशीकरबुवांनी श्रीपंतांसच आजोबांना अनुग्रह देण्याची विनंती केली. श्रीपंतांची योग्यता जाणून इतर ब्रम्हवृंदानेही आनंदाने त्यास संमती दिली. शेवटी नातवाने आजोबांना अनुग्रह दिला. एके काळी याच बाळकृष्णपंतांनी बालावधूतांना आपल्या घरातून हाकलून लावले होते, त्याच बालावधूतांच्या शिष्याकडून बाळकृष्णपंतांना अनुग्रह मिळला.

बाळकृष्णपंतांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली व ते हिंडूफिरू लागले. ते भजनपूजन करीत आपले संन्यासी जीवन व्यतित करीत. पुढे ३-४ वर्षांनंतर ३०-७-१८९४ रोजी त्यांनी देह ठेवला. श्रीपंतांनी त्यांचा देह समारंभाने बाळेकुंद्रीस नेऊन तेथे त्यांची समाधी बांधली. आजही बाळेकुंद्री गावातील वाड्यात ही समाधी पहायला मिळते.

नोकरीचा राजीनामा व उत्तरायुष्य

विद्यादानाची हौस व कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन म्हणून श्रीपंतांनी १८८१ सालापासून बेळगावच्या 'लंडन मिशन स्कूल' मध्ये नोकरी केली. या नोकरीमुळे श्रीपंत आपल्या भावांचे शिक्षण, बहिणींची लग्ने आदि जबाबदार्‍या पार पाडू शकले. जानेवारी १९०३ पासून पंतांची तब्येत हळूहळू बिघडू लागली. एव्हाना त्यांचे सर्व बंधू संसारात स्थिरस्थावर झाले होते. आता आपाले म्हातारपण सद्गुरुच्या भजनसेवेत घालवावे असा विचार करून श्रीपंतांनी जून १९०३ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. या नोकरीच्या दरम्यान शेकडो विद्यार्थी पंतांकडून शिकून गेले होते. अनेक आप्तेष्टांची, स्नेही-सोबत्यांची मुले त्यांच्या घरी राहून, सुविद्य, सुसंस्कारीत होऊन धन्य झाली होती. सामाजिक व कौटुंबिक कर्तव्ये श्रीपंतांनी व्यवस्थित पार पाडून आपल्या शिष्यांसमोर एक मोठा आदर्शच ठेवला होता.

श्रीपंतांना १८९१ साली मुलगा झाला व त्याचे नाव बाळाराम असे ठेवले. परंतु त्या मुलाची प्रकृती जन्मजातच नाजूक होती व १८९२ साली तो परधामास गेला. नंतर अनेक वर्षांनी १९०२ साली श्रीपंतांना कन्यारत्नचा लाभ झाला. मुलीचे नाव अंबाक्का ठेवण्यात आले. या सुमारास बेळगावच्या परिसरात प्लेगने धुमाकुळ घातला होता. लोकांना गावाबाहेर झोपड्यात जाऊन रहावे लागत असे. ही सर्व दगदग आणि बाळंतपणाचा त्रास होऊन श्रीपंतांचे कुटुंब सौ. यमुनाक्कांची प्रकृती हळूहळू बिघडत गेली. ८ मार्च १९०४ रोजी यमुनाक्कांचे निधन झाले.

आदर्श पत्नी कशी असावी याचे यमुनाक्का ह्या मुर्तिमंत उदाहरण होत्या. लग्नानंतर गृहलक्ष्मी म्हणून पंतगृही प्रवेश केल्यानंतर पंतघराण्याची अतिशय भरभराट झाली. जरी मुळची परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी दुष्काळ व भाऊबंदकीने या घराण्यास जेरीस आणले होते. माहेरची श्रीमंती असूनही यमुनाक्कांनी कधी गर्व बाळगला नाही. सुरुवातीच्या तुटपुंज्या मिळकतीवर घर अगदी व्यवस्थित चालविले. कुटुंब तर मोठे होतेच पण पाहुणेरावळेही खुप असायचे. त्यांच्या घरी आलेला याचक कधीही रिक्तहस्ते गेला नाही. भोजनास बसलेला पाहुणा तृप्त होऊनच पानावरून उठला. श्रीपंतांच्या उदार वृत्तीला यमुनक्कांच्या गृहकौशल्याची साथ मिळाल्यानेच हे शक्य झाले. त्यांच्यारूपे स्वयंपाकघरात जणू अन्नपूर्णाच वावरत असे. आजही बाळेकुंद्रीच्या मठाच्या स्वयंपाकघरास 'यमुनाक्कांचे स्वयंपाकघर' असे नाव आहे. कितीही भक्त आले तरी येथील भोजन कधीच कमी पडत नाही. अशा या यमुनाक्कांनी काया-वाचा-मनाने श्रीपंतांना प्रपंचात आणि परमार्थात साथ दिली. त्यांच्यासंदर्भात पंत म्हणतात

पावन तू रवि-तनया । वरीले धन्यत्व सेवुनी अत्रितनया ।।
आजन्म योगधारिणी । मातृ पितृ बंधु भगिनी सौख्यकारिणी ।। भक्ततापहारिणी ।।
बालगोपाळ पाडसा जेवी हरिणी । ध्यासी नित्य गुरुपाया ।।
किंचिन्मात्र नसे स्वार्थ । संतसेवामीपे साधला परमार्थ ।। जाणूनी आत्मतत्वार्थ ।।
स्वात्मानंदी केला नरजन्म सार्थ । योगिणी अवधूतप्रीया ।।
प्रेमळ सदय ह्र्दया । आर्त देखुनी त्यावरी करिसी दया ।। करूनी बोध सुर्योदया ।।
शांती भोगिसी पावुनी स्वरूपठाया । मिळसी जाऊनी दत्तराया ।।
पद २५६६

यमुनाक्का गेल्याने श्रीपंतांचे संसाराचे कर्तव्य पूर्ण झाले. सर्व जगाला प्रेमाचा संदेश देणार्‍या पंतांना दुःख तर झालेच पण द्वंद्वातीत अशा अढळ भुमिकेवर बैठक असल्याने त्यांनी या प्रसंगाचा धीरोदत्तपणे सामना केला. 'अनुभव पूर्ण होण्यासाठी तुला प्रपंच केलाच पाहिजे' अशी सद्गुरु बालमुकुंदाची श्रीशैल्यास जाण्यापूर्वी आज्ञा होती व गुरुची आज्ञा शिरोधार्थ मानत श्रीपंत संसारात पडले. श्रीपंत म्हणतात

पूर्ण केला संसार । दत्ता नेले भवाब्धिपार ।।
निवृत्तीस्तव दाविली प्रवृत्ती । स्वरूपी दिधला थार ।।
प्रपंच परमार्थ होऊनी तूचि । दाविले निजगुजसार ।।
द्वैतबंधन समूळ खंडिले । दत्तप्रेमसागर ।।
पद २५६७

सद्गुरुच्या आज्ञेप्रमाणे निवृत्तीस्तव म्हणजे स्वरूपानुभव स्थिरावण्यासाठी प्रवृत्तीमार्गाचा अवलंब करून आपण लग्न करून घेतले. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सद्गुरुच झाला व त्याने निजगुरुसार दाखवून द्वैतबंधन समूळ खंडिले आणि संसार पूर्ण करून भवाब्धीच्या पार आपणास नेले. श्रीपंतांनी आपण कशासाठी जन्माला आलो हे याप्रकारे व्यक्त केले आहे
अवधूत मार्ग प्रकट कराया । आलो जन्मासी ।।
दंभमते खंडन करूनी । बुडवी समरसी ।।
अनुभवमार्ग प्रगट करूनी । मुक्त केली दासी ।।
निजबोधामृत पाजुनी दत्त । मग्न प्रेमरसी ।।
पद २५७४
चिद्विलासे जन्म जाहला । शिवस्वरूपी अहं निमाला ।।
वासनात्रय खंडुनी सहज । भक्त प्रेमे धाला ।।
वेदशास्त्रांची नाही भीड । स्वानुभवे भरला ।।
द्वैताद्वैतातीत अवधूत । दत्तह्र्दयी भरला ।।
पद २५७५

दिवसेंदिवस श्रीपंतांची वृत्ती अधिकाधिक शांत होत चालली. प्रकृतीही खालावत होती. यास्तव ते फारसे घराबाहेर पडत नसत. आपण लवकरच देह ठेवणार असे त्यांच्या शब्दांतून जाणवायला लागले

आम्हीहि जगाचा राजीनामा देऊन फार दिवस उपेक्षिलेल्या आमच्या घरच्या व्यवस्थेस म्हणजे अवधूत चरणसेवेस शांत अंतःकरणाने अहर्निशी लागलो आहोत.

निर्वाण

सन १९०५ च्या आश्विन पौर्णिमेपासून श्रीपंतांची प्रकृती चिंताजनक झाली. भक्तमंडळी भेटण्यास येऊ लागली. काही दूरच्या भक्तांना दृष्टांत होऊन तेही श्रीपंतांचे दर्शन घेऊन गेले. आश्विन वद्य ३ शके १८२७, १६-१०-१९०५, सोमवार, रोजी पहाटे श्रीपंतांना जोरात श्वास लागला. त्यांची स्थिती पाहून जमलेल्या भक्तमंडळींनी एकतारी घेऊन 'ॐ नमः शिवाय'चा जप करण्यास प्रारंभ केला. श्रीपंतांच्या मातोश्री, बंधुभगिनी जमल्यावर श्रीपंतांची यथासांग पूजा करण्यात आली व पळीभर श्रींचे तीर्थ त्यांच्या मुखी घातले गेले. श्रीपंतांनी त्यांना आपणास उठवून बसवण्यास सांगीतले. तसे करताच सर्वांकडे प्रेमभराने पाहून श्रीपंतांनी डोळे बंद करून समाधी लावली व उगवत्या सुर्याच्या साक्षीने श्रीपंतमहाराज निर्गुण निराकार सद्गुरुस्वरूपी ऐक्य पावले. शेवटपर्यंत त्यांची नाडी हाताला चांगली लागत होती व चेहरा अखेरपर्यंत व निर्वाणानंतरही एखाद्या निद्रिस्त माणसाप्रमाणे दिसत होता. 'समाधीस्थितीतच अंतसमयी मी जाईन' असे ते एकदा म्हणाले होते व तसेच शांतपणे ते गेले.

श्रीपंतांच्या देहाचा अंत्यसंस्कार बाळेकुंद्रीस करण्यात आला. श्रीपंतांच्या पार्थीवाची पूजा करून उत्सवाच्या वेळची जरीची कफनी त्यांना घातली गेली. डोक्यावर जरीचा मंदिल, गळ्यात स्फटिकांची माला व पुष्पहार घालून त्यांना एका धमणीत बसवण्यात आले. एका बाजूस श्रीपंतांच्या मातोश्री व दुसर्‍या बाजूस श्रीपंत बंधू गोपाळराव बसले. धमणीसमोर भक्तमंडळी 'ॐ नमः शिवाय' चा गजर करीत चालली होती. कापूर, धूपादि सुगंधद्रव्ये वापरली गेली. गुलाल, बुक्का उधळीत ही मिरवणूक बेळगावाहून बाळेकुंद्रीस निघाली. वाटेतल्या गावांतील भक्तमंडळीही त्यात सामील होत जाऊन हा भक्तांचा महासागर बाळेकुंद्रीस पोहोचला. बाळेकुंद्री गावातील श्री रामेश्वर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून हल्ली जेथे श्रीदत्तसंस्थान आहे त्या आमराईत ही मिरवणूक थांबली. आमराईच्या पूर्व बाजूस मोकळ्या जागेत चंदनाची चिता रचली गेली व श्रीपंतांचा देह अग्निनारायणाच्या स्वाधीन केला गेला. तिसरे दिवशी रक्षा भरल्यानंतर त्या चितेच्या ठिकाणी औदुंबर वृक्ष लावण्यात आला. वृक्षाच्या भोवती यथावकाश षटकोनी कट्टा बांधला गेला व त्याला लागून श्रीपंतांच्या पादुका स्थापून श्रीपंतमंदिर बांधण्यात आले. याच मंदिरात आपण हल्ली जातो.
उलट दृष्टीने देख । मनुजा गुरुस्वरूप अल्लख ।।
राव-रंक भेद सर्वहि सांडूनी । जात गोत्र करी राख ।।
कैंचे ज्ञान कैंचे ध्यान । कैंचा अनुभव चोख ।।
बालमुकुंदपदी अनन्य होता । न उरे सुख वा दुःख ।।
पद ८७

।। ॐ नमः शिवाय ।।

This is a web page in Marathi
If you cannot see it properly, click here

Click here for English versions