श्रीपंतमहाराजकृत आरत्या

श्रीदत्तप्रेमलहरी या ग्रंथातील आरत्या या प्रकरणात एकूण ८४ आरत्या आहेत. त्यातील काही लोकप्रिय व पंतभक्तांच्या मेळाव्यात सतत गायल्या जाणाऱ्या या काही निवडक आरत्या :

आरती अवधूता || जय जय आरती अवधूता || धृ. ||
मीतूपणाचा भाव टाकुनी || दर्शन दे संता || १ ||
ज्ञानाज्ञान खेळ कल्पुनी || सुख देसी चित्ता || २ ||
प्रेमास्तव हा जन्म घेतला || बाणली खूण दत्ता || ३ ||
पद २६४२
दत्तात्रया ओवाळू तुज आरती || धृ. ||
काषायांबर दंड कमंडलू || संगे श्वान शोभती || १ ||
दीन दयाघन अमूर्तमूर्ती || अवतरसी जगती || २ ||
भक्तभिमानी भक्तवत्सल तू || दत्त भजन प्रीती || ३ ||
पद २६८०
मंगलारती गुरुची करू || भवसागर सहज तरू || धृ. ||
ज्ञानविज्ञान उजळूनी ज्योती || निवारू ही मायाराती || १ ||
अहंभाव अर्पुनी पायी || बुडी देऊ स्वरूपडोही || २ ||
नित्यानंद समाधी भजनी || दत्त चरण नित्य ध्यानी || ३ ||
पद २६५७
ओवाळू आरती || गुरुसी || ओवाळू आरती || धृ. ||
तनमनधन वाती जाळूनी || भक्ती तेल वरुती || १ ||
स्वयंप्रकाश दीप्ती उजळूनी || हरू द्वैतभ्रांती || २ ||
त्रिपुटीरहित सद्गुरूअवधूत || दत्ता प्रेम चित्ती || ३ ||
पद २६५३
सर्वांठायी दत्त माझा || कवणा ओवाळू || धृ. ||
अंतर्बाह्य दत्त भरला || तोचि दयाळू || १ ||
नाही आर्ति केली आरती || स्वयंज्योती पाजळू || २ ||
भेदची नाही भक्ती कैची || परब्रम्ह केवळू || ३ ||
दत्तावधूत प्रेमस्वरूप || नित्य हृदयी कवळू || ४ ||
पद २६९६
प्रेमाची आरती || गुरुसी || प्रेमाची आरती || धृ. ||
द्वैताद्वैतवाती जळली || सहज स्वयंज्योती || १ ||
गुरुशिष्य निमले बोधसागरी || स्वानुभवदीप्ती || २ ||
आत्मस्वरूपी दत्त देखिला || नाही भिन्न स्थिती || ३ ||
राजाधीराज योगीराज श्रीसद्गुरू पंतराज महाराज कि जय ||
श्रीगुरुदेव दत्त अवधूत ||
This is a web page in Marathi
If you cannot see it properly, click here

Click here for English versions